शिवरायांचा मावळा अवघा पाच वर्षांचा; सर केले सहा हजार फुट उंचीचे जॉर्ज एव्हरेस्ट शिखर
नागपूर : वय वर्षे अवघे पाच… ध्येय मात्र एव्हरेस्ट सर करायचे… एवढ्या कमी वयात तर ते शक्य नाही, मग काय आईवडिलांना त्याचा हट्ट मोडवेना. मग काय.. तर उत्तराखंडमधील मसुरतील सर्वात उंच जॉर्ज एव्हरेस्ट शिखरची चढाई करायचे ठरले. हा चिमुकला थकेल, हार मानेल असे त्याच्या आईवडिलांना वाटले, पण समुद्रसपाटीपासून ६ हजार ५७८ फूट उंचीचे हे शिखर त्याने लिलया सर केले
शिवराज हा सचिन आणि सुजाता कापुरे यांचा मुलगा. लहानपणापासूनच वेगळे काही करण्याची जिद्द असलेला. उत्तराखंडातील मसुरी येथे स्थित हा डोंगर मुलासह आईवडिलांनी देखील सर करण्याचा निश्चय केला. सायंकाळी चार वाजता ते जॉई एव्हरेस्टच्या पायथ्याशी होते. सोबत असलेल्या सर्व ‘ट्रेकर्स’मध्ये शिवराज हा सर्वात लहान. इतक्या उंचीवर मुलाला नका नेऊ, त्याला झेपणार नाही, असा सल्ला सारे देत होते. त्यामुळे आईवडिलांचा उत्साह मावळत असला तरी शिवराज मात्र, तेवढ्याच उत्साहाने समोरसमोर जात होता.
बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर आईवडिल थकले आणि त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला, पण शिवराज ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याचा उत्साह बघून आईवडिलांनी समोर जाण्याचा निर्णय घेतला. सूर्यास्त व्हायला आला होता, पण शिवराजला उंचावर जाऊन सूर्यास्त पाहायचा होता आणि त्यासाठी त्याची पावले वेगाने समोरसमोर जात होती. जॉर्ज एव्हरेस्ट हाऊसला पोहोचल्यानंतर सरळ वरच्या दिशेने ट्रेकिंगला सुरुवात झाली. अवघड चढणांपैकी हा एक मार्ग होता. मात्र, शिवराजने स्वत:च हे शिखर सर केले नाही तर त्यानिमित्ताने त्याच्या आईवडिलांना देखील ते सर करता आले. शिखरावर पोहोचताच सर्वांनी चिमुकल्या शिवराजचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत कौतुक केले.