जळगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले, विद्युत पर्यवेक्षकही अडकला
बुलढाणा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी केलेल्या मोठ्या कारवाईत जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक यांना बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
मुख्याधिकारी आकाश डोईफोडे आणि विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके अशी लाचखोरांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल काढण्यासाठी या दोघांनी ‘मोबदला’ मागितला. मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली असता ठेकेदाराने ‘लाचलुचपत’ कडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने आज बुधवारी सापळा रचला. मुख्याधिकारी आकाश डोईफोडे ( ३२)आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (३० वर्ष ) याना पालिकेतच तक्रारदाराकडून बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा रहिवासी आहे. बुलढाण्याच्या पोलीस उप अधिक्षक शितल घोगरे , निरीक्षक सचिन इंगळे, महेश भोसले , शाम भांगे, विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी, नितीन शेटे, अरशद शेख यांनी ही कारवाई केली.