Breaking News
recent

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी - जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया

 



जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक


    बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :  जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, पुरवठा अथवा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा. कुठेही अंमली पदार्थांबाबत विक्री, पुरवठा किंवा साठा निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. गुन्हे दाखल करून आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी आज दिल्या.   जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या दालनात आज 26 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना जिल्हा पोलीस अधिक्षक बोलत होते.  यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त श्री. राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव, सहाय्यक आयुक्त (औषधे) अतुल बर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी बळीराम गिते आदी उपस्थित होते.

    शेड्युल्ड ड्रग्ज विक्री करणाऱ्या औषधी दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देत जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले, शेड्युल्ड ड्रग्ज दुकांने तसेच याबाबत माहिती देण्यासाठी ड्रग्ज असोसिएशनची बैठक बोलवावी.  जिल्ह्यात अफु किंवा गांज्याची लागवड होत असल्याची माहिती आल्यास, निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करावी. त्यासाठी पोलीस स्टेशननिहाय आढावाही घेण्यात यावा. कुरीअर किंवा पोस्टाच्या माध्यमातून येणाऱ्या पार्सलची कसून तपासणी करावी. विदेशातून येणारे पार्सल किंवा विदेशात पाठविण्यात येणाऱ्या पार्सलच्या तपासणीसोबतच देणाऱ्या तसेच घेणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रेसुद्धा तपासावीत.

    ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे  उत्पादन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कारखाने बंद असल्यास त्यावर विशेष लक्ष ठेवावे. एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्याकरीता प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात यावे. यावेळी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सुचना केल्या.


Powered by Blogger.