तुरीची झाडे कापल्याचा जाब विचारणाऱ्या ४ आरोपीस कारावासाची शिक्षा
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
तुरीची झाडे कापल्याचा जाब विचारणाऱ्या सुनेसह सासऱ्यास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तांदुळवाडी येथील दोघा भावांसह त्यांच्या पत्नींना येथील प्रथम वर्ग ( न्यायालय २ ) न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन महिने कारावास व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा आज २७ जुलै रोजी सुनावली आहे. सुरेश वासुदेव खराटे, रंजना सुरेश खराटे, राजेंद्र वासुदेव खराटे व छायाबाई राजेंद्र खराटे अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. शेतातील तुरीची झाडे कापल्याचा जाब विचारला म्हणून २५ सप्टेंबर २०१७ रोजी वरील आरोपींनी तांदुळवाडी येथील एका गृहस्थास घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या सुनेलाही मारहाण करण्यात आली. तिचे डोके संरक्षक भिंतीवर आपटून जखमी करण्यात आले. याप्रकरणी दसरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोहेको अशोक येरळीकर यांनी चौकशी अंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले आहे.