हिवरा आश्रम येथील प्राजक्ता इंगळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. प्राजक्ता नितीन इंगळे यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयाने रद्द ठरवले आहे. त्यांचे विरोधात गावातीलच प्रशांत तोताराम बोरे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवर अपर जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतली असता सौ. प्राजक्ता इंगळे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. ग्रा.प. अधिनियम कलम १४(ज -३) अन्वय सदस्य पदावरून इंगळे यांना अपात्रतेचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयाने दिला आहे.
प्रशांत बोरे रा.विवेकानंद नगर हिवरा आश्रम यांनी अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्या सौ. प्राजक्ता नितीन इंगळे यांचे विरोधात त्यांना अपात्र ठरवण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला होता. सौ . प्राजक्ता इंगळे या २०२०-२०२१ या निवडणुकीत सदस्य पदी निवडून आल्या होत्या.तसेच त्या पती नितीन विठोबा इंगळे यांच्यासह एकत्र कुटुंबात राहतात. तर त्यांचे पती सह विवेकानंद नगर येथे शासनाच्या मालकीच्या जागेवर अनुक्रमांक १४१३ वर मालमत्ता क्रमांक १३८५ मध्ये दगड चुना सिमेंट यांनी बांधलेले पक्के घर आहे.
प्राजक्ता व नितीन इंगळे यांनी नमुना आठ नुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधलेले असल्याने त्यांचे सदस्य पद रद्द करण्यात यावे अशी विनंती बोरे यांनी केली होती. बोरे यांच्या अर्जावर सुनावणी घेताना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. प्राजक्ता इंगळे हजर झाल्या परंतु त्यांनी लेखी जवाब दाखल केला नव्हता. त्यामुळे त्यांना युक्तीवादाचे संधी देण्यात आली. परंतु अंतिम संधी देऊनी लेखी जबाब सादर केला नाही त्यामुळे अपर जिल्हाधिकारी न्यायालयाने अखेर प्रकरण अंतिम आदेशासाठी बंद केले होते. या प्रकरणात ग्रामपंचायत सचिव. तलाठी. मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल मागितला होता .
या अहवालात देखील प्राजक्ता व नितीन इंगळे यांचे शासकीय जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे अशी बाब निर्देशनास आली होती. ग्रामपंचायत नमुना आठवर मालकाचे नाव शासन तर भोगवट दाराचे नाव नितीन विठोबा इंगळे असे दर्शविलेले दिसून आले. त्यामुळे ग्रामपंचायत सचिव तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा संयुक्त अहवाल व ग्रा.प.नमुना आठचे अवलोकन केले असता अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय पुढे प्राजक्ता व नितीन इंगळे यांच्या अतिक्रमण स्पष्ट झाले. त्यामुळे प्राजक्ता इंगळे यांनी एकत्रित कुटुंबातील सदस्य म्हणून ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४(ज-३) च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने दिला आहे.११जुलै पासून प्राजक्ता इंगळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाले आहे.