Breaking News
recent

पेट्रोलपंप मॅनेजर लूटमार प्रकरणात फिर्यादीच निघाला आरोपी

चौघांना अटक; १ लाख ८ ३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

चार लाखांपेक्षाही अधिक रक्कम ९ जुलै रोजी मलकापूर तालुक्यातील हरसोडा गावानजिक दुचाकीस्वारांनी लुटल्याची तक्रार देणारा पेट्रोलपंपाचा मॅनेजरच या प्रकरणात आरोपी निघाल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता, सोमवारी त्यांना एकदिवसाची कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी त्यांना जामीन देण्यात आला आहे.

   याप्रकरणी तक्रारकर्ता असलेला मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथील द्वारका किसन सेवा केंद्र पेट्रोलपंपाचा मॅनेजर अभिजित सुनील कापसे (रा. धरणगाव) याने दसरखेड एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली होती. त्यामध्ये पेट्रोल पंपाचे काम आटोपून कुन्हा काकोडा येथून चार लाख ४१ हजार ५२५ रुपयांची रक्कम असलेली बॅग घेऊन मलकापूरकडे येत होता. त्यावेळी हरसोडा गावानजीक पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी डोक्यात लोखंडी रॉड मारला. याबाबत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, रायटर मंगेश अढाव यांना हा प्रकार बनावट असल्याचे समजले. त्यांनी फिर्यादीस ताब्यात घेतले. 

  पोलीस खाक्या दाखविताच अभिजित कापसे पोपटासारखा बोलू लागला. चौकशीदरम्यान अभिजितने धरणगाव येथील त्याचा लहान भाऊ अभिषेक सुनील कापसे (२३), रोशन शरद महाजन (२५), सूरज सुनील पाटील (२२) यांच्या सोबतीने 'बनावट लूटमारीची स्टोरी' बनविल्याचे पोलिसांना सांगितले. फिर्यादीसह त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख ९०९१३ रुपये, दोन दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण १,८३,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी चौघा आरोपींना मलकापूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.

Powered by Blogger.