एसटीला १८ लाखाचे उत्पन्न: खामगाव रा. प. आगाराला विठुराया पावले
प्रतिनिधी नागेश सुरंगे
खामगाव आगारातून पंढरपूरसाठी यंदा ५५ बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून १८ लाख १३ हजार २८५ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने आगाराला विठुराया पावले आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भक्तांसाठी आगारातर्फे यावेळी ८० बसचे नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ५५ बसेस सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख आर. यू. पवार यांनी दिली.
खामगाव ते पंढरपूर पहिली बस १ जुलै रोजी सोडण्यात आली. १० जुलैपर्यंत पंढरपूरसाठी तर खामगावसाठी ३ ते १४ जुलैपर्यंत बस फेऱ्या सोडण्यात आल्या. खामगाव ते पंढरपूर बसफेऱ्यांच्या माध्यमातून ९ लाख १७ हजार १४४ तर पंढरपूर ते खामगाव बस फेऱ्याच्या माध्यमातून ८ लाख ९६ हजार १४१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. खामगाव आगारातील बसेस व्यतिरिक्त गोंदिया, तुमसर येथून आठ बस बोलावण्यात आल्या होत्या.