सासरकडील व्यक्तींकडून मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात वाढ
मलकापूर भिवंडी (मुंबई) येथून माहेरी आलेल्या पत्नीला सासरी घेवून जाण्यासाठी आलेल्या सासरकडील मंडळीला १० जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये मेडीकल रिपोर्टवरून कलम ३०७ चा गुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, सागर प्रकाश पाटील रा. भिवंडी (मुंबई) यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला सासरकडील मंडळीने माझ्यासह माझे आई-वडील व नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची तक्रार आठ दिवसांपुर्वी दिली होती. त्या तक्रारीवरून शिवाजी सदाशिव सुरंशे, प्रकाश सदाशिव सुरंशे, दिपक प्रकाश सुरंशे सुनंदा प्रकाश सुरंशे, कविता शिवाजी सुरंशे, अरूण अग्रवाल, दिपाली सागर पाटील, अरूण तुकाराम लोणे, अशोक श्रीपात पाटील (सुर्यवंशी), भगवान दगडू तायडे यांचे विरुध्द सागर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप.नं. ४५५ / २२ अन्वये कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ३२३, ३४१, ३५४ ब, ५०४, ५०६ भादंविसह कलम ४, २५ आर्म अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तर यातील गंभीर जखमी सागर पाटील व त्याचे नातेवाईकांवर जळगाव खांदेश येथे उपचार सुरू असून डॉक्टरांनी दिलेल्या मेडीकल रिपोर्टवरून पोलिसांनी उपरोक्त गुन्ह्यात कलम ३०७ चा समावेश केला आहे. या प्रकरणी ६ पुरूष आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर महिला आरोपींपैकी दोन महिलांची जामिनावर सुटका झाली असून फिर्यादीची पत्नी दिपाली सागर पाटील हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी अरूण अग्रवाल हे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नरेंद्रसिंह ठाकूर व पोहेकॉ मंगेश चरखे, संजय वेरूळकर हे करीत आहेत.