Breaking News
recent

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने मलकापूर दुमदुमले!

 


मलकापूर ः प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांची शहरात आज, 19 फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार उत्साहात साजरी करण्यात आली. भगवामय झालेल्या शहरात संपूर्ण दिवसभर शिवजयंतीचा उत्साह, चैतन्याचे वातावरण आणि जल्लोष अनुभवावयास आला. शिवजयंतीच्या पर्वावर हजारो नागरिकांच्या सहभागात अत्यंत उत्साहात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान निनादलेल्या छत्रपती शिवराजांच्या जयघोषाने मलकापूर शहर दुमदुमून गेले.

छत्रपती शिवाजी नगरातील श्री भवानी मंदिरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पूजन करून विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जगदंबा ढोल पथकाच्या सदस्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी 12 वाजताच्या सुमारास शहरात प्रथमच युवतींनी दुचाकींची रॅली काढून शिवजयंती सोहळ्यात उत्साहात आपला सहभाग नोंदविला. या पाठोपाठ ऑटोरिक्षा चालकांनीही रॅली काढण्यात काढली. 

शहरातून जल्लोषात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील ऐतिहासिक प्रसंगांना उजाळा देणारे देखावे सादर करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी नगर, यशवंत नगर, जाधववाडी, दुर्गा नगर,गाडेगाव मोहल्ला,माता महाकाली नगर, चाळीस बिघा, पुरोहित कॉलणी, लक्ष्मी नगरातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या दरम्यान मलकापूर नगरीत भगवामय वातावरण निर्माण झाले होते.  यामध्ये हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

                                            ऐतिहासिक शिवजयंती सोहळा उत्साहात; प्रात्यक्षिके, देखाव्यांनी फेडले डोळ्यांचे पारणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाचा समारोप हनुमान चौकात करण्यात आला. सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष विजयराव जाधव, आई तुळजाभवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. छत्रपती शिवजयंती समारोपप्रसंगी शिवरायांच्या ऐतिहासिक प्रसंगांनाउजाळा देणारे देखावे, लेझीम, ढोल पथकाचा आविष्कार तसेच विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या सोहळ्यादरम्यान पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरात 10 पोलीस अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी, 20 एसआरपी जवान, 70 होमगार्ड जवान असा मोठा ताफा सज्ज होता.


शिवरायांच्या पुतळ्याचा शहारे आणणारा इतिहास

        मलकापूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा इतिहास आजही आठवला तर अंगावर शहारे येतात. पुतळा बसवताना उद्भवलेल्या बिकट स्थितीचे वर्णन ऐकताना कोणीही काही काळासाठी स्तब्ध होऊन जाईल, असा तो प्रसंग होता. शहरात ज्यावेळी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो, त्यावेळी शिवाजी नगरातील नागरिकांनी काही वर्षांपूर्वी पुतळा बसवताना केलेल्या संघर्षाची कथा अंगावर शहारे आणते. काही वर्षांपूर्वी प्रशासनाने शिवरायांचा पुतळा बसविण्यात विरोध केला होता. परिसरात बाजूला मुस्लिम समुदायाचे वास्तव्य होते. त्यावेळी प्रचंड विरोध असताना आणि संचारबंदी लागू असताना, रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात शिवरायांचा हा पुतळा बसविण्यात आला होता, अशी माहिती जुने जाणकार देतात. आज शिवजयंतीनिमित्त मलकापूर तालुक्यातील नव्हे तर इतर ठिकाणावरून आलेल्या शिवभक्तांनी शिवरायांच्या या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी त्याकाळी बसवलेल्या पुतळ्याचा इतिहास आठवल्याने अंगावर शहारे आल्याचे अनुभवावयास आले.

...........

Powered by Blogger.