Breaking News
recent

स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात

   


पुणे : पुणे स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून दलालांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी तीन दलालांना अटक करण्यात आली असून दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाने तरुणींना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. दलाल समाजमाध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमधील खोली घेऊन दलाल परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घ्यायचे. ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने सर्व व्यवहार करत होते. ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला आणि सापळा लावला. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये दलालांनी दोन खोल्या आरक्षित करुन ठेवल्या होत्या. या ठिकाणी दोन तरुणींना बोलविण्यात आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमित जमदाडे, इरफान पठाण, इम्रान नदाफ आदींनी ही कारवाई केली

Powered by Blogger.