मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीची यादी जाहीर; पुढील आठवड्यात वैद्यकीय चाचणी
मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या ८७३ उमेदवारांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. यादीतील पात्र उमेदवारांची पुढील आठवड्यात वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण झाल्यानंतर ही तुकडी सेवेत दाखल होणार आहे.अग्निशामक संवर्गातील ९१० पदांसाठी, पुरुष व महिला उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया दिनांक १३ जानेवारीपासून सुरू झाली होती.
दहिसर (पश्चिम) मधील गोपीनाथ मुंडे मैदान या ठिकाणी राबवलेल्या या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या उमेदवारांना वेळेअभावी सामावून घेता आले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना टोकन देण्यात आले होते व नंतर त्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांना धावणे, जम्पिंग शीट मध्ये उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे जोर काढणे, अशा मैदानी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ९१० जागांपैकी ८७३ जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( mcgm. gov.in ) जाहीर झाली आहे. त्यात महिलांसाठी राखीव २७३ जागांकरिता पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अपंग वर्गासाठी एकूण ३७ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.