Breaking News
recent

अपत्यप्राप्तीसाठी पूजा मांडली, ७० हजार उकळले आणि लैंगिक शोषण, भोंदूबाबा पोहोचला थेट कारागृहात

  


अमरावती : अपत्‍यप्राप्‍तीसाठी पूजा करावी लागेल, असे सांगून एका भोंदूबाबाने महिलेचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्‍याची घटना दर्यापूर तालुक्‍यातील कुकसा येथे उघडकीस आली. या भोंदूबाबाने पीडित महिलेकडून ७० हजार रुपयेदेखील उकळले. या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.

सतोष गजानन बावने (३०, रा. कुकसा, ता. दर्यापूर) असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. आपल्‍या अंगात देवाची सवारी येते, असा दावा तो करीत होता. पूजाविधीनंतर निपुत्रिक स्त्रिया गरोदर राहतील, अशी थाप मारत होता. पीडित २३ वर्षीय महिलेने बावने याच्‍याशी संपर्क साधला. पूजा आणि उतारा केल्‍यास बाळ होईल, असे आमिष आरोपीने दाखवले. पूजेचा खर्च म्‍हणून ७० हजार रुपये उकळले. या भोंदूबाबाने पीडित महिलेचे ३ मार्चपासून अनेकवेळा लैंगिक शोषण केले.

महिलेच्‍या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी संतोष बावने याच्‍या विरोधात बलात्‍कार, महाराष्‍ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्‍या विविध कलमांसह ॲट्रॉसिटी कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला व त्‍याला अटक केली.

Powered by Blogger.