Breaking News
recent

दरोड्याच्या तयारीत असलेले बारा दरोडेखोर जेरबंद

 


डहाणू प्रतिनिधि : महेश भोये

पालघर येथे मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या हत्यारबंद टोळीला जेरबंद करण्यास पालघर पोलिसांना यश आले आहे.  त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारी विविध हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील काही दरोडेखोरांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पालघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे व कर्मचारी रवींद्र गोरे, आर पवार,लहांगे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत होते. पालघर रेल्वे स्टेशन ते नवली फाटक परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मंगळवारी पहाटे ०३.१५ वाजताच्या सुमारास पालघर पुर्व येथील नवली फाटका जवळील एस. बी. आय. बँकेच्या ए. टी. एम. च्या बाजुला असलेल्या मोकळया जागेत अंधाराच्या ठिकाणी काही जण दोन टेम्पोसह संशयीतरीत्या हालचाली करीत असल्याचे  निदर्शनास आले. 

या संशयित तरुणांना पोलिसांनी जाब विचारताच अंधाराचा फायदा घेवून पळून जात होते. त्यावेळी पोलीस व स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून टोळीतील  १२ जणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता ते मोठ्या दरोड्याच्या उद्देशाने आले असल्याची कबुली त्यांनी दिली. टोळी मधील तीन जण वसई येथील, तीन जण नालासोपारा येथील, दोन जण वडाळा येथील, एक जण शहापूर, तर एक जण उल्हासनगर येथील आहे.

दोन टेम्पो, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नॉयलॉन दोर, लोखंडी कटावणी, दोन हॅन्डलचे खिळे काढण्याचे लोखंडी कटर, वायर कापण्याचे लोखंडी कटर तसेच मिरची पुड असे साहीत्य या टोळीकडून हस्तगत करण्यात आले. टोळीचे म्होरक्या सलमान व शोएब यांचा पत्ता अजूनही लागलेला नाही. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.बारा दरोडेखोर पालघर पोलीसांच्या अटकेत असून त्यांच्यावर  भा.द.वि.सं. कलम ३९९, ४०२, सह आर्म अॅक्ट क. ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हा पालघर पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे करीत आहेत.

उप विभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, महिला सहा. पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाट,उपनिरीक्षक बालाजी मुंढे, संकेत पगडे, दौलत आतकारी, पोलीस कर्मचारी सुभाष खंडागळे, रविंद्र गोरे, आर पवार, आव्हाड, सुरूम,  मुसळे, खराड,  लहांगे, डुबल, कांबळे या पथकाने दरोडेखोरांचा दरोड्याचा डाव उधळून लावला.

Powered by Blogger.