Breaking News
recent

गोखले एज्युकेशन सोसायटीचा आधारवड हरपला

 


डहाणू प्रतिनिधि : महेश भोये

*कोसबाड केंद्रातील कर्मचाऱ्यांनी वाहिली सर डॉ. मो. स. गोसावी यांना श्रद्धांजली*

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी यांचे दिंनाक ९ जुलै रोजी दुःखद निधन झाले त्यानिमित्त  नामदार गोपाळ कृष्ण गोखले कृषि विद्यानगर कोसबाड येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी श्रध्दांजली वाहताना संस्थेचा मुख्य आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मराठे, किसन चौधरी, प्रवदा बारी यांनी सरांबद्दल बोलताना त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व, असामान्य बुद्धिमत्ता, वक्तशीरपणा, भाषेवर प्रभुत्व, सरांना मिळालेले पुरस्कार आदींबाबत माहिती दिली. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नागेश्वर संखे यांनी डॉ. गोसावी सर छोटया छोटया गोष्टीवर कसे लक्ष देत, इतरांना मान देण्याचं त्यांचे कौशल्य याबाबत माहिती देऊन सरांचे राहिलेले मेडिकल प्रोजेक्टचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आपण सढळ हस्ते मदत करुया असे सांगितले. पंचायतराज प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख जयराम पाटकर यांनी डॉ. गोसावी सरांचे व्यक्तिमत्त्व कसे प्रभावी होते, त्यांना लाभलेले अध्यात्मिक अधिष्ठान याबद्दल माहिती दिली. सरांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली. माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक पठाडे यांनी डॉ. गोसावी सर शिस्तप्रिय होते असे सांगून गोसावी सरांना दोन्ही हाताने लिहिता येत होते याबाबत माहिती दिली. पुणे विद्यापीठात अजूनही त्यांच्या सुवाच्य हस्ताक्षरातील पेपर आजही जपून ठेवल्याचे सांगितले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सर्वोच्च पुरस्कार डॉ. गोसावी यांना शिक्षण क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल दिला गेला याची आठवण पठाडे यांनी करून दिली.  आश्रम शाळेच्या अधिक्षिका वीणा माच्छी यांनी सरांचे एकूण कर्तृत्व कसे घडले यावर प्रकाश टाकला, अमोघ वक्तृत्व, डॉ. गोसावी सर प्राचार्यांचे प्राचार्य, सारस्वतांचे सारस्वत झाले. नूतन बाल शिक्षण संस्थेचे सदस्य तसेच कृषिभूषण विनायक बारी यांनी डॉ. गोसावी यांच्याबद्दल बोलताना सरांना सर्वच विषयाचे सखोल आणि शास्त्रीय माहिती अवगत असायची असे सांगितले. आधुनिक शेतीतील प्रयोगाबद्दल त्यांना माहिती होती. आपण प्रयोगशील असले पाहिजे याबाबत डॉ. गोसावी आग्रही असत असे चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास जाधव यांनी डॉ. गोसावी सरांना कोसबाड केंद्राविषयी अधिक आपुलकी असायची असे सांगून व्यवस्थापन शिक्षणाचे प्रणेते असलेल्या सरांचे साधी, स्वच्छ आणि टापटीप राहणी कायमच इतरांना आकर्षित करत असे असे सांगितले. सरांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. गोसावी आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन याची झालेली भेट याबद्दलचे अनुभव डॉ. विलास जाधव यांनी सांगितले. आपले काम कोसबाड केंद्राला कसे प्रगतीपथावर नेईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करून हीच सरांना श्रद्धांजली ठरेल असे मी व्यक्त केले.  

तत्पूर्वी, सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या कार्याची माहिती असलेली चित्रफित दाखवण्यात आली. शोकसभेची सांगता भगवदगीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली देशमुख आणि अशोक भोईर यांनी केले. दृकश्राव्य माध्यमासाठी अनिलकुमार सिंग यांनी विशेष मेहनत घेतली.


Powered by Blogger.