इस्रोच्या टीमने थेट मोबाईल संदेश पाठवून शहापूरच्या साने ब्रदर्स यांचे केले अभिनंदन
भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेत शहापूरच्या साने ब्रदर्स यांचा विशेष सहभाग
(सुनील केदारे ठाणे प्रतिनिधी)
भारत देशाची महत्त्वकांक्षी अशी चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली आणि भारताच्या शिरोपेच्यात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. जी कामगिरी आतापर्यंत जगातील प्रगतशील अशा देशांना करता आली नाही ती कामगिरी भारत देशाने करून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे.
या यशस्वी चंद्रयान ३ मोहिमेत जे यान वापरले गेले त्या यानाच्या इंजिनमध्ये लागणार अत्यंत महत्त्वाची फ्रिक्शन रिंग (Friction Ring) हा महत्त्वाचा पार्ट ज्यांच्या कारखान्यात बनवण्यात आला आहे ते उद्योजक सुरेश साने हे मुळचे शहापूरचे आहेत. शहापूर येथील मुंबई आग्रा रोड लगत असलेल्या केणे आळी समोरील छोट्याशा वर्कशॉप पासून साने यांनी आपला व्यवसाय सुरू केला.
सुरेश साने हे सध्या ठाणे येथे वास्तव्यास असून साने ब्रदर्स व एलोरा इंजीनियरिंग या नावाने इंजीनियरिंग वर्कशॉप व कारखाना माजीवाडा (ठाणे) व आसनगाव असे एकूण दोन युनिट आहेत. आसनगाव येथील वर्कशॉप ची जबाबदारी गणेश साने हे सांभाळतात. त्यांचे वास्तव्य शहापूर मध्येच आहे. मागील चंद्रयान २ मोहिमेसाठी देखील त्यांनीच फ्रिक्शन रिंग (Friction Ring) बनवून दिल्या होत्या. चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर या मोहिमेतील इस्रोच्या शास्त्रज्ञांनी साने ब्रदर्स यांना मोबाईल फोनवर विशेष संदेश पाठवून साने ब्रदर्स यांच्या कौशल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले.
शहापूरचे उद्योजक सुरेश साने व गणेश साने यांचा चंद्रयान ३ मोहीम यशस्वीते मध्ये विशेष असा सहभाग आहे. त्यांच्या इस्रोतील शास्त्रज्ञ सोबत अनेक बैठका पार पडल्या शास्त्रज्ञांना काय हवे आहे व आपण ते कशा प्रकारे कुशलतेने बनवून देऊ शकतो. याबाबत सखोल चर्चा करून साने ब्रदर्स यांनी फ्रिक्शन रिंग तयार केली. साने ब्रदर्स यांचा चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेत असलेल्या सहभागाबद्दल समस्त भारतातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे शहापूरचे उद्योजक असल्याकारणाने शहापूरच्या पंचक्रोशीतून तसेच ठाणे जिल्ह्यातून त्यांचे विशेष कौतुक व सन्मान होत आहे. समस्त शहापूरकरांना ते शहापूरचे उद्योजक असल्याचा सार्थ अभिमान आहे अशी भावना समस्त शहापूरकरांमध्ये व्यक्त होत आहे.