सात वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या ग्रामस्थांच्या दगडफेकीत पोलीस जखमी
जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे ७ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह मिळाल्याप्रकरणी तपासात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गावातच राहणान्या १९ वर्षीय तरुणाने केल्याचे समोर आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गोंडगावमधील ७ वर्षीय मुलगी रविवारी, ३० जुलै रोजी सायंकाही घरी न सापडल्यामुळे मुलीच्या अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर मंगळवारी, १ ऑगस्ट रोजी मुलीचा कुजलेला मृतदेह त्यांच्या घराजवळील शेतकऱ्यांच्या कडबा कुटीत आढळून आला होता. गावातीलच तरुण स्वप्नील विनोद पाटील याच्यावर पोलिसांना संशय आला. ज्या कडव्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला ती कुट्टी गोठ्यात होती. हा गोठा स्वप्नील पाटील याचा होता. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक सखोलपणे चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला.
३० तारखेला दुपारी मुलीला आमिष दाखवून त्याने गोठ्यात बोलवले. नंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. दरम्यान दोन दिवसांनी ग्रामस्थांना उग्र वास आल्याने प्रकरण उघड झाले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत ग्रामस्थांनी पोलिसांसोबत वाद घातला. त्यातच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे तीन पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांनी लाठीमार करत गर्दी पांगवली. यावेळी पोलिसांच्या सरकारी वाहनांचेही दगडफेकीत नुकसान झाले. यामुळे गोंडगावात मोठा तणाव निर्माण झाला. जखमींमध्ये चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे दीपक पाटील यांना हाताला मार लागला. प्रकाश पाटील यांना पायाला मार लागला आहे. नितीन रावते यांच्या डोक्याला मार लागला आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.