Breaking News
recent

कॅफे, कॉफी शॉपसह १२ ठिकाणी छापे – कारवायांमुळे चालक, मालक सतर्क

 नाशिक – शहर परिसराला गुन्हेगारीच्या पडणाऱ्या विळख्यामुळे शहर पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाईला सुरुवात झाली आहे. कॅफे, कॉफी शॉप, हुक्का पार्लर अशा १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या विषयी गुन्हे नोंदवले जात आहेत. पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून ज्या कारणांवर बोट दाखवित कारवाई होते, अशी साधने, साहित्य, आसन व्यवस्था कॅफे, कॉफी शॉपमधून रातोरात बदलली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांना पालकमंत्री दादा भुसे यांनी अमली पदार्थासह अवैध धंद्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला आहे. हा शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवैध धंदे आकर्षित करत असल्याने कारवाईची सूचना भुसे यांनी केली. इंदिरा नगर परिसरात पोलिसांनी चार ठिकाणी कारवाई केली असता अनेक आक्षेपार्ह्य गोष्टी आढळल्या. पोलिसांनी चार कॅफे मालकांवर गुन्हे दाखल केले. कॉलेजरोड परिसरात आठ ठिकाणी छापे टाकले असता अनेक कॉफी शॉपमध्ये महापालिकेच्या नियमांना डावलत अतिक्रमण केल्याचे आढळले.

दरम्यान, महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईमुळे कॉफी शॉप चालक, हुक्का पार्लर सतर्क झाले आहेत. गुरूवारी पोलिसांनी ठिकठिकाणी पाहणी केली असता अनेक ठिकाणी रातोरात आसनव्यवस्था, अन्य व्यवस्था काढून टाकल्याचे आढळले. काही साहित्य फेकून दिल्याचे दिसले. याविषयी गंगापूर रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी माहिती दिली. गुरूवारी अनेक ठिकाणी पाहणी केली असता अनेकांनी आपल्या दुकानात बदल केल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. या कारवाईत बेकायदा मद्यासह हुक्क्याचे साहित्य असा सुमारे साडे सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सौरभ देशमुख (रा. देशमुख वस्ती, म्हसरूळ-आडगाव लिंकरोड), सुरेंद्र धामी (रा. म्हसरूळ-आडगाव लिंकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.

                                    हॉटेलांमध्ये अतिक्रमण

        कॉलेज रोड, थत्ते नगरसह अन्य भागात पोलिसांनी कारवाई करत १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात सात हॉटेल हे अतिक्रमणाच्या मुद्यावर गोठविण्यात आले. या कारवाईत आसन व्यवस्था, पडदे, लोकांना एकांत मिळेल, अशी व्यवस्था व साधने पुरविण्यात आल्याचे दिसून आले. या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला.– डॉ. किरणकुमार चव्हाण (पोलीस उपायुक्त)

Powered by Blogger.