Breaking News
recent

मराठा आंदोलनाचा एसटी सेवेला ब्रेक, नाशिक ते छत्रपती संभाजीनगर बस फेऱ्या रद्द


नाशिक – मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरावर आंदोलकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आंदोलनाला वेगळे वळण प्राप्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावू लागल्याने मराठा आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करणारे आंदोलक आता दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागले आहेत. प्रामुख्याने आमदार, खासदारांसह इतर लोकप्रतिनिधींविरोधात सर्वसामान्यांचा अधिक रोष असून बहुसंख्य गावांनी आमदार, खासदारांना गावबंदी केली आहे. मंत्र्यांची वाहने अडवून त्यांना आंदोलकांकडून जाब विचारण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण, आंदोलन, मुंडण, प्रतिकात्मक प्रेतयात्रा आदींच्या माध्यमातून राज्य सरकारविरोधातील संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले.मराठवाड्यात मराठा आंदोलन अधिक आक्रमक झाल्याने आणि काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने बससेवेचे नुकसान होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागातून संभाजीनगरसाठी दर अर्ध्या तासाने बस जात असते. विभागातून २५ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या विषयी प्रवाश्यांना पूर्व कल्पना नसल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. याविषयी विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी, संभाजीनगर आगाराकडून आलेल्या सूचनेनुसार नाशिक विभागातील २५ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले. पोलीस आणि अन्य आगाराकडून येणाऱ्या सूचनेनुसार या बस फेऱ्या पुढील काही काळासाठी अनिश्चित स्वरुपात बंद राहतील. फेऱ्या बंद राहिल्याने किती महसूल बुडाला, याची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संभाजीनगरला जाणाऱ्या महामंडळाची बससेवा रद्द झाल्याचा फायदा खासगी बस चालकांनी घेतला आहे. दिवाळीची सुट्टी अवघ्या काही दिवसांवर आली असताना बससेवा बंदमुळे प्रवाश्यांना अडचणी येत आहेत. प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.


Powered by Blogger.