Breaking News
recent

वाघोलीजवळ महाविद्यालयीन तरुणाचा खून ; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय


 पुणे : नगर रस्त्यावर वाघोली परिसरात महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. प्रेमप्रकरणातून त्याच्या ओळखीतील तरुणाने खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न मिळाली आहे.महेश साधू डोके (वय २१, रा, वाल्हेबोलाई, ता. हवेली, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश वाघोली परिसरातील एका महाविद्यालयामध्ये तृतीय वर्षात होता. तो वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात राहत होता. 

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास  तो महाविद्यालयातून घरी निघाला होता. बकोरी रस्त्यावर त्याच्यावर ओळखीतील तरुणाने कोयत्याने वार केले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिक विद्यार्थ्यांनी महेशला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्रावमुळे त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार त्याचा एक मित्र त्याला ससूनमध्ये नेत होता. मात्र, वाटेतच महेश मरण पावला.

दरम्यान, रुग्णालयात नेण्यात येत असताना महेशने हल्लेखोराचे नाव मित्राला सांगितले. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाविद्यालयातील आणि वसतिगृहातील महेशच्या मित्रांकडे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.  महेशने मित्राला दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Powered by Blogger.