समलिंगी विवाह : निकालाच्या फेरविचाराबाबत सर्वोच्च न्यायालयात उल्लेख खुल्या न्यायालयात सुनावणीचे निवेदन
नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारणाऱ्या निकालाच्या पुनर्विचाराची विनंती करणाऱ्या याचिकेवर खुल्या न्यायालयामध्ये सुनावणीबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयासमोर उल्लेख करण्यात आला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठाने याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्या यावरील निवेदनाची नोंद घेतली. समलिंगी विवाहाला मान्यता देण्याची विनंती करणाऱ्या लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खुल्या न्यायालयात सुनावणीची आवश्यकताअसल्याचे निवेदन रोहतगी यांनी केले होते. सरन्यायाधीश म्हणाले, मी पुनर्विचार याचिकेची अद्याप पडताळणी केलेली नाही. मला हे त्यांना (संबंधित घटनापीठाच्या न्यायाधिशांना) वितरित करू द्या. रोहतगी म्हणाले की, (घटनापीठाचे) सर्व न्यायाधीश यावर सहमत आहेत की, समलिंगी व्यक्तींबाबत भेदभाव होतो. जर भेदभाव होत असेल तर तो दूर करणेही गरजेचे आहे. अनेक लोकांचे जीवन यावर अवलंबून आहे.