चारित्र्याच्या संशयातून पतीकडून महिलेवर चाकूने वार
पुणे : चारित्राच्या संशयातून महिलेवर चाकूने वार केल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी पतीला विमाननगर पोलिसांनी अटक केली. अशोक लक्ष्मण आढाव (वय ३१, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री आढाव आणि त्याची पत्नी विमाननगर भागातील एका उपाहारगृहात जेवण करण्यासाठी गेले होते.आढावने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पत्नी उपाहागृहातून बाहेर आली. आढावने उपाहारगृहासमोर पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. तुझे एकाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. त्याने पत्नीवर चाकूने हल्ला चढविला. आढावने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.