रायगडचे नवीन जिल्हाधिकारी किशन जावळे कर्तव्यावर रुजू.
तळा प्रतिनिधी : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक कर्तव्यदक्ष कठोर अधिकारी म्हणून योगेश म्हसे यांनी जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळविला होता. नियमानुसार प्रशासन चालवीने हा त्यांचा गुणधर्म जिल्ह्यातील राज्यकर्त्यांना अडसर ठरत होता त्यामुळे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तडकाफडकी बदली करण्यात आली अशी नागरीकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. आपल्या कारकीर्दीत जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
याशिवाय त्यांच्याच कार्यकाळात लोणेरे येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नियोजन, रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळा यांसारख्या अनेक मोठ्या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पावसाळ्यातील ईर्शाळवाडी दुर्घटनेत अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचवणे, तसेच तेथील दरडग्रस्त नागरीकांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कारकिर्दीतील प्रशासकीय कामामुळे शासनाच्या सुशासन निर्देशांक उपक्रमात रायगड जिल्हा अधिक वरचढ ठरला आहे. तत्कालीन राज्यपाल महोदय कोशारींनी त्यांच्या उत्तम प्रशासकीय कामाबद्दल पाठीवर कौतुकाची थाप मारली.मावळते जिल्हाधिकारी म्हसे यांनी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी जावळे यांना पुढील प्रशासकीय कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.