Breaking News
recent

हिंजवडीत ७९ वर्षीय पतीकडून ७५ वर्षांच्या महिलेचा खून

 


 पिंपरी : गावी जाण्यावरून झालेल्या घरगुती भांडणातून ७९ वर्षीय पतीने ७५ वर्षांच्या महिलेवर राहत्या घरात कोयत्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी हिंजवडीत उघडकीस आली.

आशा महेंद्र जैन (वय ७५, रा. विंड मिल व्हिलेज, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती महेंद्र दयालचंद्र जैन (वय ७९) हे जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जैन यांचे जावई संदीप सुभाषचंद जैन (वय ५७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी महेंद्र आणि आशा यांच्यात मंगळवारी रात्री गावी जाण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर दोघे झोपायला गेले. सकाळी सहा वाजता फिर्यादी संदीप हे फिरून आले. त्यानंतर ते दूरचित्रवाणी पाहत बसले होते. सकाळी सात वाजता त्यांची पत्नी आई-वडिलांना उठवायला गेली असता आई-वडील दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आरोपी महेंद्र यांनी घराच्या बागेतील कामासाठी आणलेल्या कोयत्याने पत्नीवर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार करून घेतले. यात त्यांच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर किरकोळ जखमा झाल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.

Powered by Blogger.