देशी बनावटी दोन पिस्टल व काडतुससह जोडपे ताब्यात
गुन्हे शाखेची कारवाईः १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त
भगवंता चोरे संग्रामपूर (प्रतिनिधी)
: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक भयरहित पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मध्यप्रदेशच्या सिमेला लागून असलेल्या जळगाव जामोद, तामगाव व सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत काल २३ एप्रिल रोजी बुलडाणा गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीवर महाराष्ट्र सिमेत घुसलेल्या एका जोडप्याला अटक केली. अशोकसिंग नंदासिंग पटवा व त्याची पत्नी रा.पाचोरी ता. खकनार जि. बु-हाणपुर मध्यप्रदेश असे दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल, २३ जिवंत काडतुस व एक दुचाकी असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेली दुचाकी ही देखील पोस्टे द्वारकापुरी जि. इंदौर येथे २०२२ साली दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याची असल्याचे समोर आले आहे. सदर कारवाई जिपो अधीक्षक सुनील कडासने, एएसपी अशोक थोरात, बी. बी. महामुनी व मलकापूर येथील उपविभागीय पोलिस अधीकारी डि.एस. गवळी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत पथकातील पोनि अशोक लांडे, सपोनि आशिष चेचरे, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, एजाजखान, पोना गणेश पाटील, युवराज राठोड, पोकों गजानन गोरले, मपोकों आशा मोरे यांचा समावेश आहे