Breaking News
recent

हुतात्मा स्मारक येथील टाकीचे काम तत्काळ चालू करा : शिनगारे




किल्लेधारूर, बातमीदार:-राम फावडे

 धारूर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांतर्गत बाजारपेठेसाठी हुतात्मा स्मारक येथेही पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून, हे काम त्या ठिकाणी करू नये यासाठी शहरातील काही नागरिकांनी निवेदन दिले होते. पण, हुतात्मा स्मारक येथेच योग्य जागा असल्याने या जागेवरच टाकी उभारावी, यासाठी शिवसेनेचे अजित शिनगारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला आहे. धारूर शहराच्या दृष्टीने नव्याने पाइपलाइनचे काम सुरू आहे, यासाठी शहरात दोन ठिकाणी पाणी साठवण करणे आवश्यक असल्याकारणाने एका टाकीचे कसबा भागातील तलावाजवळील ठिकाणी काम चालू आहे. 

तर, पेठ विभागासाठी हुतात्मा स्मारक या ठिकाणी चालू आहे. हुतात्मा स्मारक हे ठिकाण शहराच्या उंच ठिकाणावर असल्यामुळे पेठ विभागाला पाणीपुरवठा करताना पाणी दाबाची कसलीही अडचण येणार नाही व पूर्ण क्षमतेने पाणी नागरिकांना मिळणार असल्याने ती जागा योग्य आहे. मात्र, काही नागरिकांनी टाकीचे काम बंद करण्यासाठी नगरपालिकेला निवेदन दिले आहे व काम थांबवले आहे. मात्र बीड, परभणी व अन्य ठिकाणी स्मारकांत पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, याची दखल घेऊन धारूर शहरात पाण्याच्या टाकीचे हुतात्मा स्मारक येथे काम सुरू आहे. ते काम मागील काही दिवसांपासून बंद आहे. ते काम तत्काळ सुरू करावे, यासाठी ९ जूनरोजी शिवसेनेचे अजित शिनगारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास १३ जूनरोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


Powered by Blogger.