सातपुडा कॅम्पसमध्ये नेत्रदान जनजागृती अभियान संपन्न
प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने १३ जुलै २०२५रोजी 'नेत्रदान जनजागृती अभियान' कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मा.कुलपती, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला तथा मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आयोजित नेत्रदान जनजागृती अभियान कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाला सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक तथा सातपुडा कॉन्व्हेंटचे कार्याध्यक्ष डॉ.संदीप वाकेकर अध्यक्षस्थानी होते. वानखडे नेत्रालय, अकोला येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.निलेश वानखडे हे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून लाभले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी नेत्रदान जनजागृती अभियाना बाबत प्रास्ताविकात नेत्रदांनाचे महत्त्व विषद केले. डॉ.संदीप वाकेकर यांनी मार्गदर्शन करत असताना नेत्रदान हे केवळ श्रेष्ठदान नसून जीवनदान आहे असे मत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले नेत्ररोग तज्ञ डॉ.निलेश वानखडे यांनी नेत्रदान कधी आणि कसे करावे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी नेत्रदानाबद्दल समाजात असलेले विविध गैरसमज दूर करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले आणि नेत्रदान करण्याबाबत सर्व उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी, प्रा.सचिन शिंगणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे आणि डॉ.अनिकेत उमाळे यांनी विद्यार्थी आणि इतर उपस्थितांची नेत्रदानासाठी नोंदणी करून कार्यक्रमाची सांगता केली.