Breaking News
recent

माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला नम्र आवाहन !




संदीप उके मोहाडी /करडी प्रतिनिधी,

दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी माझा वाढदिवस आहे. मात्र, सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातही दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, आपल्या शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे.

या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी बांधव मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या भीषण परिस्थितीमुळे आपल्या काही शेतकरी बांधवांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार प्रामाणिकपणे सर्व शेतकरी बांधवांच्या व बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रासह आपले तुमसर-मोहाडी तालुकेसुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत.अशा परिस्थितीत शेतकरी बांधव संकटात असताना माझा वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही.

त्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व हितचिंतकांना नम्र विनंती आहे की, माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे पोस्टर, बॅनर लावू नयेत, कोणताही गाजावाजा करू नये. तसेच सोशल मीडिया, वृत्तपत्रे किंवा अन्य माध्यमांवर वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट, जाहिरात अथवा बातमी प्रसिद्ध करू नये.

माझ्या शेतकरी बांधवांच्या व बळीराजाच्या घरात पुन्हा सुखाचे दिवस व सुखसमृद्धी यावी, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, हीच माझी वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना आहे.माझ्या या विनंतीचा आदर करून सर्वांनी सहकार्य करावे, ही कळकळीची नम्र विनंती.

आपला स्नेही राजू माणिकरावजी कारेमोरे आ., तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ

Powered by Blogger.