तीन ठिकाणी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मुद्देमालासह अटक
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आशीर्वादच्या बाजूला असलेल्या बालाजी जिनिंग मधून साडेपाच हजारांचा ऐवज तसेच अजित इंटरनॅशनल स्कूल मधून दोन कुलर व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टीनशेड मधून ३ क्विंटल तूर चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना येथील डी.बी. पथकाने एका शेतातून अटक केली. पथकाने आरोपींनी शेतात लपवून ठेवलेला मुद्देमालही जप्त केला आहे. ही कारवाई २१ एप्रिल रोजी केली. सुनील लालशिंग भवरे वय २२ व साईराम न्यानशिंग बरड्या वय २० रा. निमखेडी ता. जळगाव जामोद अशी आरोपींची नावे आहेत.
रसलपूर शिवारातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टीनशेड मधून ३१ मार्च ते ४ एप्रिलचे दरम्यान १९ हजार ५०० रुपये किंमतीची तीन क्विंटल तुर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार आकाश अरुण डागा यांनी नांदुरा पोलिसांत केली होती. आकाश डागा यांनी २३ व २४ मार्च रोजी साठ किलो वजनाचे ३७१ कट्टे तूर या टीनशेड मध्ये ठेवले होते. त्यातील सहा कट्टे चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना हॉटेल आशीर्वादच्या बाजूला असलेल्या बालाजी जिनिंग मधून ७ ते १६ •एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ५ हजार ४५० रूपयांचा माल चोरून नेला होता. या बाबतची तक्रार सुपर वायझर अनिल केशव गवळी यांनी नांदुरा पोलिसांत केली होती. त्यानंतर अजित इंटरनॅशनल स्कूलमधून सीसीटीव्हीची वायर कापून दहा हजार रुपये किंमतीचे दोन कुलर १९ ते २० एप्रिलच्या दरम्यान चोरीला गेल्याची घटना घडली. या चोरीची तक्रार मुख्याध्यापक भूषण प्रतापसिंग पाटील यांनी नांदुरा पोलिसांत केली होती. दरम्यान, डी.बी. पथकाने वडी शिवारात असलेल्या अरुण करुटले याचा शेतात काम करणाऱ्या जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथील शिनील लालसिंग भवरे व साईराम न्यानशिंग बरड्या या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी तीन चोऱ्यांची कबुली देऊन चोरीतील माल करुटले याचा शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेला माल शेतातून जप्त करून आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई नांदुरा ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे नापोका गजानन जायभाये, नापोका राहुल ससाणे, विनायक मानकर, सलीमबरडे, विष्णू गीते, रवी झगरे व चालक पंकज डाबेराव यांनी केली आहे.