विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट
![]() |
उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे |
पुणे : उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. विदर्भात या महिन्यातील तिसरी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे.
बहुतांश भागात तापमान ४० अंशांपार गेले असून, मुंबईजवळील काही भाग आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक भागात तापमान विदर्भाप्रमाणे ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण एप्रिलमध्ये उन्हाचा तीव्र चटका होता, आता महिन्याचा शेवटही तीव्र काहिलीतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलेला आहे. या महिन्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या. मुंबई आणि उपनगरांमध्येही एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. उत्तरेकडून सातत्याने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यातून तापमानात वाढ नोंदिवली जात आहे. बंगलाच्या उपसागरातून गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यातून उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट नोंदिवली जात होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव कमी होत आहे.
पुढील एक ते दोन दिवस सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांत एक ते दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार असले, तरी तापमानातील वाढ कायम राहणार आहे. उत्तर-दक्षिण भारतातील तापमानात पुढील दोन दिवस कमाल तापमानात आणखी दोन अंशांनी वाढ अपेक्षित आहे. दोन दिवसांनंतर मात्र तापमानात काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सध्या विदर्भात बहुतांश भागात ४२ ते ४४ अंशांवर तापमान असून, ते सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी अधिक आहे. पश्चिम-मध्य आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ नोंदिवण्यात येत असून, या भागात ४० ते ४३ अंशांदरम्यान तापमान आहे. मराठवाडय़ाचा पारा ४० ते ४१ अंशांवरून आता ४२ ते ४३ अंशांच्याही वर पोहोचला आहे. मुंबई आणि परिसरात तसेतच कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे.
वाढ कशामुळे?
राज्याच्या काही भागामध्ये सध्या दिवसाच्या कमाल तापमानात अचानकपणे वाढ झाली. हवामान विभागाच्या प्रमुख केंद्रांवर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी विभागांत सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेला आहे. उपकेंद्रांवर आणि तालुक्याच्या केंद्रांवरही तापमानातील वाढ मोठी आहे. ठाणे जिल्ह्यांत आणि मुंबई विभागात काही ठिकाणी यंदा अनेक वर्षांनंतर कमाल तापमान ४० ते ४४ अंशांवर नोंदिवले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान असल्याने मुळातच तापमानात वाढ आहे. त्यातच राजस्थानपासून महाराष्ट्राच्या जवळील गुजरात, मध्य प्रदेशामध्ये उष्णतेची लाट आहे. या भागातून कोरडे आणि उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. या दोन्हीचा परिणाम म्हणून तापमानात झपाटय़ाने वाढ नोंदवली जात आहे.
ब्रह्मपुरी ४५.१ अंश सेल्सिअस विदर्भात एप्रिलमध्ये अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आदी भागात सातत्याने देशातील उच्चांकी ४४ ते ४५ अंश तापमानाची नोंद झाली. बुधवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उर्वरित भागातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे- अकोला ४४.८, बुलढाणा ४१.८, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४३.८, नागपूर ४४.८, वाशिम ४३.५, वर्धा ४५.०, औरंगाबाद ४२.१, परभणी ४३.७, नांदेड ४२.२, पुणे ४१.३, कोल्हापूर ३९.७, महाबळेश्वर ३३.०, नाशिक ४१.०, सांगली ४०.२, सातारा ४०.६, सोलापूर ४३.०, मुंबई ३४.५, सांताक्रुझ ३७.२, अलिबाग ३४.१, रत्नागिरी ३५.७.