मराठा आरक्षण प्रश्नी जाब विचारत समन्वयकांचा मंत्रालयात ठिय्या
मुंबई – मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खासदार छत्रपती संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनांची राज्य सरकारला आठवण करून दिली. जोपर्यंत मुख्यमंत्री येणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले. खासदार छत्रपती संभाजीराजेंना दिलेली आश्वासने सरकारने न पाळल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी याबद्दल लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बोलून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सचिवांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांना आजींना भेटायला वेळ आहे, मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करायला वेळ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी समन्वयकांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात खासदार संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीला आमरण उपोषण केले होते. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे ही विनंती करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने संभाजीराजे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी संभाजीराजेंसोबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या केल्याने खासदार संभाजीराजे यांनी आमरण उपोषण मागे घेतले. मात्र दिलेली मुदत संपूनही राज्य सरकारने कोणतीच हालचाल केली नसल्याने तसेच आश्वासनांची पूर्तता न केल्याने यावेळी मराठा तरुण व समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली.