Breaking News
recent

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर निर्णयाची शक्यता

 


    देशात कोरोनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला होता. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा एकदा सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी 12 वाजता ही ऑनलाईन बैठक होणार असून, पंतप्रधान देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. देशात हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

    देशात गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस?


या कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोरोनाची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.

देशात गेल्या आठवड्याभरात दोन हजारांहुन अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानी दिल्लीत रोज 1 हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोनाचे 1204 नवे रुग्ण आढळले आहे. तर 863 जण बरे झाले असून एका जणाचा मृत्यू झाला. दिल्लीत सध्या 4508 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी देशभरात 2506 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर 1910 जणांनी कोरोनावर मात केली असून, 6 जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

देशातील कोरोनाची स्थिती


नवीन रुग्णांच्या भरतीनंतर, देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 4,30,62,569 वर पोहोचली आहेत. देशात कोरोनामुक्त होण्याचा दर 98.75% इतका आहे. तर देशात आतापर्यंत 5,23,622 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुलांसाठी 2 लसी मंजूर


ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनला 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. याशिवाय, Zydus Cadila ची Zycov D ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 2-12 वयोगटातील मुलांना भारत बायोटेकचे कोवॅक्सिन लागू करण्यासाठी डेटा मागवण्यात आला होता.

मास्क सक्तीवर बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता

राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृतीगटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. त्यानंतर संबंधितांशी विचारविनिमय करून राज्य सरकार मास्क सक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर ललित कांत यांनी मास्क सक्ती काढल्यानंतर रुग्णसंख्या वाढू शकते असं म्हटलंय. “लोकांनी मास्क काढल्यानंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होणं अपेक्षित होतं. ही रुग्णसंख्या कमी जास्त होत राहणार आहे. मात्र गंभीर आजार आणि होणारे मृत्यू यासंबंधीची आकडेवारी जास्त महत्वाची आहे,” असं कांत म्हणालेत.

बैठकीला अधिकारीही राहणार उपस्थित


देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये असतील. या बैठकीमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.


Powered by Blogger.