विवेकानंद सार्व.वाचनालयास आमदार निधीतून ४ लाख रु. अर्थसहाय्य देण्याची आ. राजेश एकडे यांची घोषणा.
आजच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक वातावरण अभ्यासिकेतून प्राप्त होते. त्यासाठी शासन स्तरावर या उपक्रमासाठी अर्थसाहाय्य केले जाते .विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आमदार निधीतून सुमारे चार लाख रुपयांची मदत केल्या जाईल, अशी घोषणा मलकापूर विभागाचे आमदार श्री राजेश एकडे यांनी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिनांक 23 एप्रिल २०२२रोजी ग्रंथप्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना केली.
विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून दिनांक 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 पर्यंत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार राजेश एकडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.श्री मधुकरराव वडोदे
खामगाव हे उपस्थित होते अध्यक्ष म्हणून भाषणात उद्बोधन करताना प्रा. वडोदे म्हणाले की वाचन संस्कृती टिकवणे आजच्या काळात गरजेचे झालेले असून, बुद्धीमध्ये वृद्धि करिता वाचनाचा छंद जोपासावा लागेल. पुस्तक वाचनातून मानवाच्या विकासाची दिशा निश्चित होते, आणि हे कार्य ग्रंथालयाच्या मार्गानेच शक्य आहे म्हणून ग्रंथालयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ग्रंथालयाच्या गर्भातून राष्ट्राची उभारणी होत असते .जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला मार्गदर्शक म्हणून ग्रंथालयाकडे बघावे. पुस्तक जतन करून त्याचे पठण करणे आवश्यक झालेले आहे .वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथप्रदर्शनी यासारखे उपक्रम पूरक ठरतात. तेच कार्य विवेकानंद सार्वजनिक वाचनालय सातत्याने करीत असल्याबद्दल वाचनालय अभिनंदनास पात्र आहे असे प्रशंसोद्गार काढून त्यांनी आपले भाषण संपवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान नवोदित साहित्यिक श्री रुस्तम होनाळे यांना महाराष्ट्र राज्याचा साहित्य क्षेत्रातील ठोकळ पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार महोदयांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकरराव वडोदे यांनी त्यांचे प्रसिद्ध झालेले ग्रंथ वाचनालयास भेट म्हणून दिलेत. त्याच प्रमाणे श्री गजानन मुळे यांनी फेमस बुक सेंटर व ऋचा प्रकाशनाचे पुस्तके प्रभाकर शंकर मुळे यांच्या वतीने वाचनालयास भेट म्हणून दिलीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय वाचनालयाचे उपाध्यक्ष गजानन डोंगरकार तर आभार प्रदर्शन संजय नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाचे सचिव विजय सारभुकन यांनी केले.कार्यक्रमास बहुसंख्येने वाचक वर्ग उपस्थित होता. ग्रंथप्रदर्शनी वाचकांना पाहण्यासाठी दिनांक 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 पर्यंत दररोज सकाळी 8:30 ते 12 पर्यंत व दुपारी 4 ते 6 या वेळेत उपलब्ध राहील. या ग्रंथप्रदर्शनीचा ग्रंथ प्रिय मंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री संजय नेमाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सौ. वृषाली आडोळकर लिपिक वर्षा नेमाडे व अभ्यासिके मधील विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.