अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी मलकापूर
मलकापूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध अध्यात्मिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान परशुराम जयंती जन्मोत्सव थाटात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मलकापूर शहरामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ६ वाजता गौरक्षण येथे गोमातेचे पुजन व चारा तसेच नैवेद्य , दुपारी १२ वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात येवून संध्याकाळी ६ वाजता लि.भो.चांडक विद्यालयाच्या प्रांगणावरून भगवान परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रा टाळ, ढोल-ताशेच्या निनादात तथा पारंपारीक वेशभुषेतील महिला व पुरूष तथा युवक-युवतींच्या भव्य उपस्थितीत शिस्तबध्द पध्दतीने काढण्यात आली. तर रथामध्ये भगवान परशुराम यांची वेशभूषा साकारलेला युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सदर शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून भगवान परशुरामांच्या जय जयकारात निमवाडी चौक, सिनेमा रोड, बुलडाणा रोड मार्गाने चांडक विद्यालयात पोहचल्यानंतर त्याठिकाणी भगवान परशुरामजींच्या आरतीने शोभायात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या शोभायात्रेचे मार्गावर महिला भगिणींनी सडासारवण व रांगोळ्या काढल्या होत्या. तर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येवून भगवान श्री परशुरामाच्या मुर्तीचे ठिकठिकाणी पुजन करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेकांकडून या शोभायात्रेत सहभागी असलेल्यांना थंडपेयाचे वितरण करण्यात आले.
या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव तथा भक्तगण सहभागी झाले होते. भगवे फेटे तथा भगवी टोपी घालून पुरूष तथा महिला मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. तर भगवान श्री परशुरामाच्या जय जयकाराने संपूर्ण मलकापूर भगवान श्री परशुमय झाले होते. तसेच शोभायात्रेतील आकर्षक सजावट जनतेचे लक्ष वेधून घेत होती. तर यावेळी महिलांची उपस्थिती ही उल्लेखनीय अशी होती. यावेळी आ.राजेश एकडे, माजी आमदार चैनसुख संचेती यांचेसह सामाजिक, राजकीय, सेवाभावी संस्थांचे अनेक जण प्रामुख्याने सहभागी झाले होते. सदर शोभायात्रा यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पोलिस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, लि.भो.चांडक विद्यालय समिती यांचे सहकार्यपूर्वक योगदान लाभले.