Breaking News
recent

दोन कार समोरासमोर धडकल्या; ६ जण गंभीर, एसटी चालक, वाहक बनले देवदूत


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
    
    दोन कार समोरासमोर धडकल्याने ६ जण गंभीर जखमी झाले. बुलडाणा खामगाव रोडवरील बोथा घाटात आज, २३ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर परतवाड्यावरून बुलडाण्याकडे येणाऱ्या एसटी बसच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्याने ते देवदूत ठरले आहेत. प्राप्त माहितीनुसार बुलडाणा अर्बनचे संचालक विनोद मदनलाल केडीया (५५) व त्यांची पत्नी रजनी विनोद केडीया (५०) दोघे कारने खामगावकडून बुलडाणा येथे येत होते. तर बुलडाणा येथील ज्येष्ठ पत्रकार भानुदासजी लकडे यांची मुलगी स्वाती स्वप्नील सातंगे (२१), रेखा अंबादास सातंगे (५०), सुहानी सातंगे (१४) व चालक विशाल जोशी (४५) हे बुलडाणा येथून कारने अमरावतीकडे जात होते. हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोथा घाटात दोन्ही कार एकमेकांवर आदळल्या. या भीषण अपघातात दोन्ही कारमधील सर्वच ६ जण गंभीर जखमी झाले.
त्याच वेळी परतवाड्यावरून बुलडाणा येथे येणाऱ्या एसटी बसचे ( क्रमांक एम एच २०, बि. एल - १९३७) चालक सि. टी. गुप्ता व वाहक एस. आर. खिरडकर यांनी प्रसंगावधान राखत बस थांबवली. बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा जखमींना तातडीने एसटी बसमध्ये टाकले आणि बस थेट बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन थांबली. रुग्णालयाच्या आवारात एस. टी बस आल्याने तिथे उपस्थित सारेच बुचकळ्यात पडले. मात्र अपघाताची दाहकता समोर आल्यानंतर सर्व जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. जखमींपैकी काहींना औरंगाबाद रेफर करण्यात आले आहे.

Powered by Blogger.