पवित्रा ट्रेंडींग कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावे
प्रतिनिधी नागेश सुरंगे
पवित्रा ट्रेडींग कंपनी, एमआयडीसी, चिखली यांनी शेतमालाला जादा भावाचे आमिष देवून खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद चिखली पोलीस स्टेशनला सुनील लक्ष्मण मोडेकर, रा. सरस्वती नगर, चिखली यांनी दिली आहे. फियादीच्या तक्रारीनुसार आरोपी संतोष बाबुराव रनमोडे रा. पवित्रा ट्रेडर्स, चिखली, अशोक समाधान म्हस्के गांगलगांव ता. चिखली, निलेश आत्माराम सावळे रा. गांगलगाव ता. चिखली यांनी पवित्रा ट्रेडींग कंपनी चिखली येथे तूर, चना, सोयाबीन असा 3 कोटी 41 लक्ष 42 हजार 504 रूपयांचा शेतमाल घेवून आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच आज पावेतो 161 शेतकऱ्यांचाही त्यांनी विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे.
या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन येथे कलम 409, 406, 420, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांचे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये करीत आहे. तरी नमूद आरोपींकडून जिल्ह्यातील व आजुबाजूचे तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल जादा भावाचे आमिष दाखवून पवित्रा ट्रेंडीग कंपनी एमआयडीसी चिखली येथे खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता फसवणूक केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांचे जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे हजर राहून आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले आहे