जि.प.निवडणुकीत राहणार १५ लाखांवर मतदार
![]() |
नारीशक्तीही ठरणार निर्णायक; ८ ऑगस्टला फायनल होणार मतदार संख्या |
प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलडाणा होऊ घातलेल्या बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत १५ लाखांच्या आसपास मतदार २०४ सदस्यांचे भवितव्य ठरविणार आहे. यामध्ये महिलांचे निर्णायक मतदान असून ८ ऑगस्टला मतदारांची संख्या अंतिम होईल. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६८ गट व १३ पंचायत समित्यांच्या १३६ गणासाठीच्या संभाव्य निवडणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत आहे. आज मतदार याद्या तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या प्रारूप मतदार यादीत १५ लाख ९३ हजार ७२३ मतदारांचा समावेश आहे. यामधील (पुरुष मतदारांची) संख्या ८ लाख ४२ हजार ४६८ इतकी असून महिलांचे मतदान ७ लाख ५१ हजार २५० इतके आहे. यामध्ये इतर ५ जणांचा समावेश आहे.. अर्थात पडताळणी, हरकती व सुचनानंतर ही संख्या कमी होऊ शकते. जि.प.च्या रणसंग्रामात तब्बल १५ लाखांच्या आसपास मतदार राहणार आहे, हे नक्की.
मतदार संख्या सारखीच असे नाय!
मात्र ६८ जि. प. गट किंवा १३६पं. स. गणांची मतदार संख्या समानच असेल असे नाही, हे येथे उल्लेखनीय. वानगीदाखल सुलतानपूर गटाची प्रारूप मतदार संख्या २४ हजार ५२, जामोदची २२ हजार ४१०, गणेशपूर गटाची १८ हजार ९०० इतकी आहे. यामुळे उमेदवारांचा खर्च, वेळ आणि परिश्रम मतदार गट नुसार कमी वा जास्त होणार आहे.