उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय
प्रतिनिधी नागेश सुरंगे
७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं पडली. तसेच १५ मतं अवैध ठरली.
भाजपकडे दोन्ही सदनांत मिळून राज्यसभेतील पाच नियुक्त खासदारांसह ३९१ संख्याबळ आहे. शिवाय, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, शिंदे गटातील १२, बहुजन समाज पक्ष, तेलुगु देसम, अकाली दल या पक्षांनीही धनखड यांना पािठबा दिला. या पक्षांच्या ८१ सदस्यांची मतेही एनडीएच्या पारडय़ात पडली. त्यामुळे धनखड यांना ५२८ मते मिळू शकली.
विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना २७ टक्के मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, आप, तसेच तेलंगण राष्ट्र समिती आदींनी अल्वा यांना पािठबा दिला होता. यापूर्वी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोपाल कृष्ण गांधी यांना ३२ टक्के मते मिळाली होती. अल्वा यांना मात्र जेमतेम २७ टक्के मते मिळवता आली.
महाराष्ट्रातील ७ खासदार गैरहजर
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील लोकसभेतील पाचही खासदारांनी मतदान केले नाही. विनायक राऊत, अरिवद सावंत, राजन विचारे, संजय जाधव आणि गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे खासदार गैरहजर राहिले. राज्यसभेतील खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांनाही मतदान करता आले नाही. प्रकृतीच्या कारणास्तव अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हेही अनुपस्थित राहिले. शिंदे गटातील १२ खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.