दहा वर्षीय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला महिलेसह तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
संग्रामपूर प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून संग्रामपूर तालुक्यात लहान बालकांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. शनिवारी संग्रामपूर शहरात एका शाळकरी १० वर्षीय विद्यार्थिनीचा अनोळखी महिलेकडून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या विद्यार्थिनीने महिलेच्या हाताला चावा घेत सुटका केली. याबाबत शनिवारी रात्री तामगाव पोलीस स्टेशनला अज्ञात एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी संग्रामपूर येथे भरवस्तीत आसरा माता मंदिरासमोर चार चाकी वाहनात दोन पुरुष व एक महिला बसलेली होती. महिला वाहनाच्या खाली उतरली व तिने शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा हात घट्ट आहे पकडून चार चाकी वाहनांमध्ये ओढून नेत अपहरणाचा प्रयत्न केला. सोबत न आल्यास जीवे मारण्याची धमकी त्या अज्ञात महिलेने दिली. मात्र,विद्यार्थिनीने अज्ञात महिलेच्या हाताला चावा घेत सुटका केली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण यापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बालकांवर पारख ठेवणारे अनोळखी व्यक्ती दिसून आल्याची चर्चा आहे.
तीन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. काही माहिती असल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा.- श्रीकांत विखे, पोलीस उपनिरीक्षक
पालकांनी मुलांची काळजी घ्यावी. तसेच गावामध्ये अथवा इतर ठिकाणी अनोळखी संशयित व्यक्ती दिसून आल्यास त्याच्याकडून खात्री करावी. खात्री न पटल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा.
श्रीधर गुट्टे, ठाणेदार, सोनाळा