Breaking News
recent

दिग्दर्शक चेतन जाधव लिखित नित्यानंदच्या कार्तिक लंबेचे 'कृपा करी माझी विठू माऊली' गीताचे अनावरण संपन्न



विवेकानंद नगर, ता.मेहकर जि. बुलढाणा येथील नित्यानंद सेवा प्रकल्पांमधील एका  एकल अनाथ विद्यार्थ्याने गायलेल्या 'कृपा करी माझी विठू माऊली...' या गाण्याचे अनावरण जेष्ठ किर्तनकार तथा रामायनाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी गुप्तेश्वर संस्थान शिर्ला नेमाने येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाला चित्रपट व संगीत दिग्दर्शक श्री.चेतन जाधव व नित्यानंद सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष श्री.अनंत शेळके उपस्थित होते.

    हिवरा आश्रम येथील नित्यानंद सेवा प्रकल्पाच्या परिवारामध्ये साधारण: तीन-चार वर्षांपूर्वी कार्तिक लंबे नावाचा एक अनाथ चिमुकला दाखल झाला.त्यावेळी त्याचे वय अवघे अडीच वर्ष असेल.घरच्या भिषण परिस्थितीत त्याच्या आईला नियतीने हिरावून नेले.अश्या कठीण काळात दाखल झालेला कार्तिकचा नेहमीप्रमाणेचं अश्या गराजवंतांचे सर्वस्व आणि मायबाप ठरलेल्या श्री.अनंत शेळके माऊलीने मायेची व आपुलकीची ऊब देत त्याचा सांभाळ केला.आणि केवळ सांभाळच नाही केला तर,कार्तिक मोठा होत असतांना इतर मुलाप्रमाणे त्याच्याही सुप्त गुणांकडे शेळके सरांनी बारकाईने व कटाक्षाने लक्ष ठेवले.कार्तिक मोठा झाला.शाळेत जायला लागला..तसतसे त्याने विविध गोष्टींमध्ये आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली.

     गायनाची व संगीताची आवड असलेला कार्तिक हार्मोनियम सारख्या वाद्यावरही आता सहजपणे बोटे फिरवू शकतो.अश्यातच एकदा श्री.शेळके सरांचा माजी विद्यार्थी आणि संगीत व चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शन करत असलेले श्री.चेतन जाधव यांची एक दिवस नित्यानंद परिवारात सदिच्छा भेट झाली.नित्यानंद सेवाप्रकल्पमधील गुणवान मुलं त्यांनी पाहलीत.अन पहिल्याच भेटीत श्री.चेतन जाधव यांनी कार्तिकचा एक वेगळा गुण हेरला. 

        त्याला पुढे येण्यास 'कृपा करी माझी विठू माऊली' या भक्ती गीतातून एक संधी उपलब्ध करून द्यायचे ठरवले.त्यासाठी धडपड केली.आणि अखेरिस आज त्याच्या सुंदर आवाजात गाणं रेकॉर्ड सुद्धा झालं आहे.

       *"किस्मत का खेल बडा अजीब होता है..!"*  हे खरं आहे.घरची प्रतिकूल परिस्थिती. जीवनाचा अखंड संघर्ष.अशातच अगदी बालवयात आईच आयुष्यातून निघून जाण.पुढे सगळा अंधकार उभा राहणं.नंतर नित्यानंद परिवारात दाखल होणं..आणि आज एक बाल कलाकार,गायक म्हणून पुढं येणं ही खरोखरच नित्यानंद परिवारासाठी आणि स्वतः कार्तिक साठी देखील मोठी उपलब्धी ठरली आहे.

       या गाण्याची शब्दरचना गीतकार व संगीत दिग्दर्शक श्री.चेतन जाधव यांनी केली असून त्याला संगीतही त्यांनीच दिल आहे.ह्या गाण्याचे रेकॉर्डिंग औरंगाबाद येथील प्रसिध्द ए.एम.जी.रेकॉर्ड स्टुडिओ मध्ये झाले आहे.तर बापू साठे यांच्या (साठे स्टुडीओ,उल्हासनगर) येथे संकलन व ध्वनीमिश्रण झाले आहे.तसेच गाण्याच्या निर्मितीसाठी श्री.चेतन जाधव,श्री.सुशील मालवी,श्री.राजू निकस,श्री. भागवत येवले,श्री.सदानंद शेळके,श्री.डहाके यांनी मोलाचे सहकार्य केले.

       कार्तिकने त्याच्या गोड गळ्यात गायलेल्या या गाण्याला आज सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.श्री अनंत शेळके सर यांच्या नित्यानंद सेवा परिवारात आज कार्तिक सारखे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत,जीवनाशी संघर्ष करतात.मुलांसाठी सर्वस्व अर्पण केलेले व जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले श्री.अनंत शेळके सर आत्मियतेने व अगदी आई-वडिलांच्या आपुलकीने मुलांवर शिक्षणाबरोबरच योग्य संस्कार करतात.संगोपणा सोबतच येथे मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन अशाप्रकारे मुलांना पुढे येण्यासाठी येथे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

         अवघ्या सात वर्षाच्या छोट्या गायक कलाकार कार्तिकने सुंदर आवाजात गायन केले.त्याबद्दल कार्तिकचे,तसेच त्याचे शिक्षक आणि नित्यानंद सेवा प्रकल्पाचे सर्वेसर्वा श्री.अनंत शेळके सर यांचे आणि त्यांच्या टीमचे सर्व  स्तरातून कौतुक होत आहे.

" श्री.अनंत शेळके सर सारखे सेवाव्रती शिक्षक नित्यानंद सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून समर्पित भावनेने हजारो विद्यार्थी घडवतात.ही आम्हा नव तरूणांना कायम प्रेरित करणारी व समाजभान जागं करणारी गोष्ट आहे. " - श्री.चेतन जाधव चित्रपट व संगीत दिग्दर्शक 

Powered by Blogger.