पोलीस भरतीत राखीव जागा ठेवा -शिराळे पाटील शेतकरी सेना
लवकरच तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन |
चिखली - मनोज जाधव
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार पोलिस भरतीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के गुण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून तो रद्द करावा अशी मागणी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी शिराळे यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज चिखली शहरात आले असता शेतकरी सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शिवाजी शिराळे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले व आपल्या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केले या निवेदनाद्वारे शिराळे यांनी मागणी केली आहे की पोलिस भरतीत गुणांऐवजी या युवकांना राखीव जागेची मागणी त्यांनी केली.
गडचिरोली येथे झालेल्या भरतीमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भरतीमध्ये पाच टक्के सूट देण्याचे सोडून चक्क मिळालेल्या गुणांमध्ये पाच टक्के गुण वाढवून देऊन इतर भरती इच्छुक उमेदवारांवर अन्याय केला आहे. हा जीआर रद्द करून भरती प्रक्रिया पूर्ववत करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीमध्ये पाच टक्के जागा राखीव जागा ठेवाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी हा प्रश्न लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर मांडून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन शिराळे पाटील यांना दिले.