अतिवृष्टी.. मंठा तालुक्यात रिमझिम पावसाची हजेरी; मजुर बसले झाडाखाली कशी करावी सोयाबीन सोंगणी?
मंठा, प्रतिनिधी. शिवाजी खंदारे
मंठा : जून महिन्याच्या प्रारंभी पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगून पोत्यांमध्ये सुरक्षितरित्या ‘पॅक’ झाले. मात्र, उशिराने पेरणी झालेले सोयाबीन परिपक्व अवस्थेत शेतात उभे असून सोंगणीच्या ‘स्टेज’ला आले आहे. असे असताना रविवार, 9 ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला. सोमवार आणि आज मंगळवारीही ढगाळी वातावरण कायम राहून पाऊस सुरूच होता. यामुळे शेतात पाणीच पाणी साचून आहे. अशा स्थितीत सोयाबीनची सोंगणी कशी करावी, असा प्रश्न मजुरांसमोर उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा खरीपातील पिकांची पेरणी झालेली आहे. विशेषत: तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापलेले आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पोषक वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेनुरूप झाली. विशेषत: या पिकांवर यंदा किडरोगांचा अधिक प्रादुर्भाव न झाल्याने विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती.दरम्यान, तीन ते चार दिवसांत सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू होणार होती.
मात्र 9 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पावसाने शेतशिवारांमध्ये ढगाळ वातावरणासह पाणीच पाणी दिसून येत आहे. कापूस आणि सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणच्या शेतात पावसाची रिमझिम चालू असल्याने सोयाबीनची काढणी नेमकी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना व मजुरांना भेडसावत आहे. तथापि, यापुढेही काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.