निलेश देशमुख यांचा राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कारांनी गौरव
नांदुरा: येथील शैक्षणिक, साहित्य, कला, संस्कृती, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले निलेश रामराव देशमुख यांना महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय क्रांती योध्दा २०२२ पुरस्कार व राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
निलेश देशमुख हे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कलाक्षेत्रात सतत सहभागी होत असतात. शिवाय लोक जागृती कार्यातही त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो. वृक्षारोपण, साक्षरता, स्वच्छता, राष्ट्रभक्ती, सामाजिक ऐ्क्य, वीज व पाण्याची बचत, नेत्र व रक्तदान, स्त्री- पुरुष समानता, कोरोनाबाबत खबरदारी, यांसारख्या विविध घटकांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे करीत आहेत. वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता, पुस्तक प्रदर्शनी, प्रबोधनपर पोस्टर्स प्रदर्शन, महापुरुषांच्या जयंती दिनाच्या माध्यमातून समाजात उच्च विचार, मानवी मूल्य रुजवण्याचा प्रयत्न आणि राष्ट्र व समाज कार्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचे कार्य ते निस्वार्थ पणे करीत असतात. निश्चित ध्येय, योग्य दिशा व दृढ इच्छाशक्तीच्या बळावर निलेश देशमुख यांनी आपल्या विविधांगी कार्यातून समाजमनावर आपल्या कर्तुत्वाची छाप उमटविली आहे. लोक विलक्षण व अद्वितीय असे प्रेरणादायी कार्य व भूषणावह ठरणाऱ्या दैद्यमान कार्याचा उचित गौरव म्हणून महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक व क्रांती योद्धा २०२२ पुरस्काराने" निलेश देशमुख यांना गौरविण्यात आले आहे. तेल्हारा येथे श्री श्री शिवाजी हायस्कूल मध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात निलेश देशमुख यांना माननीय शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष उमेश म्हसाये, राज्य अध्यक्षा पद्मावती टीकार, दिनेश डाबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल निलेश देशमुख यांचे विद्यार्थी, पालक व विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.