Breaking News
recent

मलकापूरात उन्नती महिला बँकेचे ठेविदार आक्रमक बँकेत तोडफोड तर सहाय्यक निबंधक कार्यालयात हाणामारी

मलकापूर 

लाखो रुपयांच्या ठेवी परतीच्या मागणीला वारंवार वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने मलकापूरात उन्नती महिला नागरी सहकारी बँकेचे ठेवीदार आज शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाले.त्यात बँकेच्या शाखेत तोडफोड तर सहाय्यक निबंधक कार्यालयात हाणामारीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एकेकाळी डौलाने वाटचाल करणाऱ्या येथील उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून ठेवीदारांच्या ठेवी परतीची मागणी ठेवीदारांची आहे.मात्र प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने त्यांना थोपविले जात आहे.

     यासंदर्भात वारंवार ठेवीदारांच्या ठेवी परतीच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने ठेवीदार संतप्त झाले.आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास संतप्त ठेवीदारांनी उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत प्रवेश करून एकच पैसे परतीची एकसुरी मागणी करत धुडगूस घातला. संतप्त ठेवीदारांनी बँकेच्या कार्यालयात काचांची व खुर्च्यांची तोडफोड केली.त्यामुळे उपस्थित कर्मचारी चांगलेच हादरले.मात्र त्या ठिकाणी जवाबदार व्यक्ती नसल्याने थोड्या वेळानंतर संतप्त ठेवीदारांनी त्यांचा मोर्चा सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे वळवला.

     दुपारी २ वाजेच्या सुमारास संतप्त ठेवीदार सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल झाले.व त्यांनी आमच्या पैशाची परतफेड कशी होईल अशी मागणी सहाय्यक निबंधक महेश क्रुपलाणी यांच्या कडे केली.योगायोगाने त्यांच्या समवेत उन्नती महिला बँकेचे व्यवस्थापक राजेश चव्हाण हे देखील उपस्थित होते. सहाय्यक निबंधक व ठेवीदारांमध्ये चर्चा सुरू होती.तेवढ्यात ठेवीदार तथा पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रविकांत पालवे व उन्नती महिला बँकेचे व्यवस्थापक राजेश चव्हाण यांच्यात आधी शाब्दिक चकमक झाली.त्यानंतर चक्क पकडापकडी व लोटपोट झाल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला.उपस्थीतांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला.मात्र वातावरण तापतच गेल्याने सहायक निबंधक कार्यालयात एकच गदारोळ माजला व खळबळ उडाली.या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Powered by Blogger.