न.प. कार्यालया समोर प्रहारचे गोट्या खेळा आंदोलन
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर वार्ड क्र.९ मधील रहिवाशी असलेले शे.शब्बीर खलीफा यांनी सरकारी जागेवर हेअर कटींग सलुनचे दुकान थाटले असून त्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र या मागणीची न.प. प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात प्रहारच्या पदाधिकार्यांनी न.प. कार्यालया समोर गोट्या खेळा आंदोलन करीत न.प. प्रशासानाच्या कारभाराचा निषेध नोंदविला.
पारपेठ परिसरात असलेल्या वार्ड नंबर ९ धनगरपुरा भागात शासकीय जमिनीवर शे. शब्बीर खलिफा यांनी अतिक्रमण करीत हेअर कटिंग सलुनचे दुकान थाटले आहे. सदरचे दुकान हटविण्यात यावे ३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते शे.वसिम शे.शब्बीर यांनी नगर परिषद प्रशासनाकडे रितसर तक्रार दिली होती. सदर दुकानावर रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर जोर जोराने गाणे वाजविणे, दुकानात दारू पिऊन धिंगाणा घालणे, येणार्या-जाणार्या महिलांना तेथे येणार्यांकडून होणारा त्रास आदी प्रकाराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांना होणारा त्रास पाहता सदरचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र या तक्रारीची नगर पालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने सदर अतिक्रमण धारकाकडून राजरोसपणे तेथे सुरू असलेले प्रकार सुरूच होते. तेव्हा या प्रकाराला आळा घालण्यासाठी व न.प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज १८ ऑक्टोबर रोजी नगर परिषद कार्यालय परिसरामध्ये गोट्या खेळा आंदोलन करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र होत होती. सदर अतिक्रमण तीन दिवसात न काढल्यास अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह तालुका प्रमुख अजित फुंदे, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार, तालुका उपप्रमुख अमोल पाटिल, बळीराम बावस्कार, कौतिक बोराडे, अपंग आंदोलनं क्रांती सेना तालुका प्रमुख राहुल तायडे, शुभांगी डवले, शीतल जांगडे,शे. वसीम शे.शब्बीर, शेख आरिफ अन्सारी, शेख शब्बीर, सय्यद सादिक, अस्पक खान, शेख करीम, शेख इम्रान, शेख महमूद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.