संदीप गावंडे यांची अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड
नांदुरा श्रीकांत हिवाळे
सामजिक कार्यकर्ते तथा दैनिक आधारस्तंभचे संपादक संदीप गावंडे यांची अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी संदीप समाधान गावंडे हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्य केल्यानंतर त्यांनी गत वर्षभरापासून दैनिक आधारस्तंभ नावाचे स्वतःचे दैनिक वृत्तपत्र सुरू केले आहे. त्यांचा विविध विषयातील अभ्यासपूर्ण माहिती व लिखाणामुळे अगदी अल्पावधीत दैनिक आधारस्तंभ वाचकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे.
त्यातच आता अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन पत्रकारांच्या विविध हक्क व न्याय मागण्यांसाठी कार्यरत असून आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये संदीप गावंडे यांच्या माध्यमातून सदर कार्य वाढीस लागनार आहे.
पत्रकार हा नेहमी आरसा दाखवण्याचे काम करीत असतो, मग तो अधिकारी असो, राजकीय पुढारी असो वा व्यावसायिक असो. पत्रकारांच्या बातम्यांमुळेच कित्येकांवरील अन्यायाला वाचा फुटते आणि न्यायही मिळतो. पण दुर्दैवाने पत्रकारांनाच नियमित उत्पन्न नाही. अधिस्वीकृतीधारक नसले तरी सर्व पत्रकार आपापल्या परीने समाजोत्थानासाठी झटत असतात. त्यामुळे सर्व पत्रकारांना शासनाने मानधन व इतर सुविधा द्याव्यात याकरिता संगठन कार्यरत आहे. पत्रकार बांधवांना आरोग्य विम्याचे कवच उपलब्ध करून त्यांना वैद्यकीय खर्चापासून संरक्षण देण्यावर माझा भर राहील. --संदीप समाधान गावंडे अध्यक्ष, अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन