चिमुकल्यांसोबत खेळताना तरुणाचा मृत्यू आत्महत्येची चर्चा : हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा अहवाल
मलकापूर : तालुक्यातील मौजे बेलाड येथे ३२ वर्षीय तरुणाचा राहत्या घरात अचानक मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्याने आत्महत्या केल्याची चर्चा गावभर झाली. मात्र, वैद्यकीय अहवालात हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने चर्चेवर पडदा पडला आहे. तालुक्यातील मौजे बेलाड येथील रहिवासी गजानन सोपान क्षीरसागर हा त्याच्या राहत्या घरी त्याच्याच चिमुकल्या मुलांसोबत खेळत होता. मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास तो अचानक मृत्युमुखी पडला. याबाबत, गजाननच्या मुलाने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना गोळा केले.
या वेळी मृतकाची पत्नी व कुटुंबातील इतर शेतात होते. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या गावकऱ्यांना गजाननचा मृत्यू कसा झाला, याविषयी अनेक प्रश्न पडले. मृतदेह घरात पंख्याखाली पडलेला होता, तसेच त्याच्या गळ्यावर निशाण दिसल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा पसरली होती. ग्रामस्थांनी त्याला आहे त्या अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्याला मृत घोषित करून शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अहवालात हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे यांनी दिली. या प्रकरणी शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले व परिवार आहे....