संग्रामपुर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड
मतीन शेख, प्रतिनिधी
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगूल वाजला असून, या सर्व निवडणुका १८ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. संग्रामपुर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट जनतेतून सरपंच साठी मतदान होणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यामध्ये काकोडा, भोन, चोंढी, धामणगांव, कळमखेळ, एकलारा,(बानोदा), जस्तगांव, काकणवाडा खुर्द, करमोडा, काटेल, कोलद, मनार्डी, मारोड, पेसोडा, पिंपरी काथरगाव, रिंगणवाडी, सावळी, टाकळीपंच, वडगांव वान, वकाना,पातुर्डा बु. ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यातील संबंधित गावागावांत निवडणुकीचे वारे घुमू लागल्याचे दिसत आहे. अशातच पुन्हा थेट सरपंच निवडीने अनेकांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. यापूर्वी चालणाऱ्या फिप्टी-फिप्टी वर्षांच्या फॉर्म्युल्याचे गणित आता बिघडणार आहे. सध्या काही गावांमध्ये योग्य उमेदवार हवाय, असा एकच सूर मतदारांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. मात्र अनेक पैनल आपले राजनैतिक फंडे वापरताना दिसत असले, तरी आता अनेक राजकीय नेत्यांचे फिप्टी-फिप्टीचे गणित बिघडले आहे.
थेट सरपंच निवडणुकीतून आता योग्य उमेदवाराला गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. तालुक्यातील संबंधित २१ ग्रामपंचायतच्या गावांत होत असलेल्या निवडणुकांमध्ये काही जुने राजकारणी तर काही नवनिर्वाचित युवा चेहरे राजकारणात उतरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदार राजाचा कल कुणाला योग्य उमेदवार निवडला जाणार की नाही, असे बोलले जात आहे. मात्र, गावात मुख्य ठिकाणी होणाऱ्या गप्पांमध्ये गाव विकासासाठी तत्पर असणारा गावात विकासकामे खेचून आणणारा, भ्रष्टाचारमुक्त सरपंच आणि सदस्य हाच गावाचा विकास करू शकतो, असे बोलले जात आहे. आधी गावातील सदस्य म्हणून निवडून आलेले प्रतिनिधी हे सरपंचपदासाठी उभ्या राहिलेल्या सदस्याला मतदान करून सरपंच निवडत होते.
मात्र, गेल्या पाच वर्षांआधी फडणवीस सरकारने सरपंच हा जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. आणि त्या वेळेस प्रथमच अनेक गावांतील सरपंच जनतेमधून निवडून आले. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात नव्याने 'महाविकास आघाडी' सरकार बनले आणि थेट सरपंच निवडीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळेस झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 'पुन्हा' सदस्यांतून सरपंच निवड झाली. आता पुन्हा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. आणि जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतल्याने आधी जेनतेतून सरपंच झालेल्या तालुक्यातील या २१ गावातच पुन्हा सरपंच हा जनतेतून होणार आहे. निवडणुकांमध्ये सरपंच निवड ही जनतेमधून होत असल्याने सरपंचासाठी होणारी रस्सीखेच थांबली. मात्र, तीच रस्सीखेच आता सदस्य मधून उपसरपंचपदासाठी होणार आहे एवढं मात्र निश्चीत..!