पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अजय टप यांची मागणी
मलकापूर-
मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुरेश रोकडे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांच्याकडे १५ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस कर्मचारी सुरेश रोकडे (ब.नं.१३८६) यांची बेलाड हद्दीमध्ये ड्युटी लावण्यात आलेले आहे. सुरेश रोकडे यांच्याकडे असलेल्या हद्दीमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. त्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री, गांजा विक्री मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू आहे. तर चोर्यांचे प्रमाण सुध्दा वाढलेले आहे. पोलीस कर्मचारी सुरेश रोकडे यांचा त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या परिसरामध्ये कुठलाही वचक राहिलेला नसून ते या अवैध व्यवसाय करणार्यांना पाठबळ देत आहेत.
त्यातच त्यांच्याकडे ज्या गावांचा प्रभार आहे त्या गावामध्ये अवैध देशी कट्टे विक्री होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सुरेश रोकडे यांची चौकशी होणे तसेच त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी आपल्या स्तरावर उचित कार्यवाही व्हावी. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले हे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भिक मागो आंदोलन करण्यात येईल अशी मागणी अजय टप यांनी केली आहे.