तहसील स्तरावर पेंडींग असलेल्या केसेसचा निपटारा तातडीने करण्यात यावा -अजय टप
मलकापूर
शासनाच्या वतीने गोरगरीब, गरजू व गरजवंत असलेल्यांना विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणार्या मानधनाच्या केसेस तहसील स्तरावर गेल्या काही महिन्यांपासून पेंडींग असल्याने संबंधित लाभधारक या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. तेव्हा सदरच्या केसेसचा निपटारा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी ६ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार मलकापूर यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शासनाच्या वतीने श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, दिव्यांग, निराधार महिला व आदी योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू, गरजवंत असलेल्या लाभधारकांना मानधन स्वरूपात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम प्रयेक महिन्यात देण्यात येते. सदरचे अनुदान मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून अनेकांनी आपली प्रकरणे दाखल केलेली आहेत. मात्र सदर प्रकरणाचा निपटारा हा तहसील प्रशासनाकडून न झाल्याने असे लाभधारक शासनाच्या या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अनेक गरजू व गरजवंत हे शासनाकडून लाभ मिळण्यास पात्र असतांना देखील त्यांच्या केसेस पेंडींग असल्याने त्यांना शासनाचा लाभ मिळत नाही.
तेव्हा तहसील स्तरावर पेंडींग असलेल्या वरील योजनांच्या केसेसचा निपटारा आपल्या स्तरावर तातडीने करण्यात यावा व गरजूंना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली असून याबाबत तातडीने उचित कार्यवाही न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही निवदेनाच्या शेवटी अजय टप यांनी दिला आहे.