नूतन ज्यू. कॉलेज मलकापूर मधील अवैध शिकवणी घेणारे शिक्षक व मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी यांच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मलकापूर:6/12/22येथील प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच संदीप नाफडे यांनी व्यक्तिशः बुलढाणा जिल्ह्यातील अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरोधात जिल्हाधिकारी, शिक्षण विभाग तसेच शासनाच्या ई पोर्टलवर तक्रारी दाखल केल्या आहेत. सदर प्रकरणी शिक्षण विभागाने या आधीच अवैध शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु मुख्याध्यापकांनी सारवासारव करून केवळ प्रतिज्ञा लेख लिहून घेतले आहेत आणि शिक्षक कोणत्याच प्रकारचे खाजगी शिकवणी वर्ग घेत नाहीत असा खोटा अहवाल शिक्षण विभागास पाठविला होता. "कुंपणच शेत खाते" म्हटल्यावर भ्रष्ट शिक्षकांनी आपले अवैध शिकवणी धंदे अगदी उघडपणे व विद्यार्थ्यांना धमकी देत पुन्हा राजरोसपणे सुरूच ठेवले होते. तर शिक्षण विभाग आमचे काहीच वाकडे करू शकत नाही अशा आशयाचे वक्तव्य भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर हे निगरगट्ट शिक्षक करीत होते.
परंतु तक्रारदारांनी अत्यंत संयमाने हया प्रकरणाचा पाठपुरावा करीत अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांचे विरोधात चित्रफिती, छापील पत्रके तसेच ध्वनिफीत ई. पुरावे शिक्षण विभाग तसेच जिल्हाधिकारी कडे सादर केले आहेत. याची गंभीर दखल घेऊन मलकापूर येथील नूतन कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक मयूर पाटील आणि मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी यांनी दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी समक्ष चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. इतर शिक्षकांवर सुद्धा कारवाई करावी यासाठी पी. टी. ए. सदस्यांनी शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पुरावे सादर केलेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर निश्चितच कारवाई होणार यामुळे भ्रष्ट शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. सदर प्रकरणी दोषी शिक्षकांवर कारवाई न झाल्यास अश्या शिक्षकांविरोधत पी टी ए संघटना धरणे आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.